जलवाहिनीत आले तब्बल दोन कोटी लिटर पाणी

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मुख्य २५०० मिलिमिटर व्यासाच्या जलवाहिनीमध्ये पाणी घेण्याची चाचणी दुसर्‍या दिवशीही घेण्यात आली. दुपारनंतर सुमारे साडेपाच तास पंप सुरू ठेवून दोन कोटी लिटर पाणी पाइपलाइनमध्ये घेण्यात आले. हे पाणी संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत आले. एका टप्प्यावर हे पाणी नदी, नाला व ओढ्यामध्ये सोडले जात आहे.
शहराच्या नव्या २,७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केले जात आहे. 
मार्च महिन्यात या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी (दशलक्ष लिटर) पाणी शहरात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न होते. त्यातील दोन टप्पे आत्तापर्यंत यशस्वी झाले आहेत. १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाथसागरातील पाणी उपसा विहिरीत (जॅकवेल) पाणी घेण्यात आले. त्यानंतर सोमवारी (दि.२३) रात्री आठच्या सुमारास ३७०० अश्वशक्तीचा पंप सुरू करण्यात आला. पहिल्याच प्रयत्नात पंपाची चाचणी यशस्वी झाली. पंपाद्वारे मुख्य जलवाहिनीत पाणी सोडण्यात आले. हे पाणी स्मशानभूमीजवळ व्हॉल्व्हमधून सोडून दिले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी दुपारी १.२० ला ३७०० अश्वशक्तीचा एक पंप सुरू करून मुख्य जलवाहिनीत पाणी सुरू केले. 
दरम्यान, जलवाहिनीच्या फिल्टरची पॅकिंग लूज झाल्यामुळे दुपारी दोनला पंप बंद करण्यात आले. पॅकिंगची फिटिंग करून पुन्हा दुपारी तीनला पंप सुरू केला. कमी दाबाने मुख्य जलवाहिनीत पाणी सोडण्यात आले. जॅकवेल ते संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यापर्यंत सुमारे साडेतीन किमी अंतरात दोन कोटी लिटर पाणी भरण्यात आले. त्यासाठी साडेपाच तास पंपिंग सुरू ठेवण्यात आले. या दरम्यान कुठेही लिकेज आढळून आले नसल्याचे जीवन प्राधिकरणाच्या वीज विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार टेकवडे यांनी सांगितले. पाणी उपसा करण्यासाठी दोन्ही पंपांची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, सध्या एकाच पंपामार्फत पाणी उपसा करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.